Back

ती… पण वेगळी

सुस-पाषाणच्या टेकड्यांच्या मध्ये असलेली ती सोसायटी बाहेरून पाहिली तर अगदी साधी, व्यवस्थित, आणि ओळखीची वाटायची. सकाळी लोक ऑफिसला धावत, संध्याकाळी मुलांचा गोंधळ, आणि रात्री पार्किंगमध्ये गाड्या लावून परतणारे रहिवासी—सगळं काही नेहमीसारखंच. त्या सोसायटीत प्रसन्ना आणि त्याची बायको श्रेया, श्री-रश्मी, स्वप्निल-वैषू, आणि सिनियर सिटिझन कपल विद्या आणि कैलास—हा ग्रुप जवळपास कुटुंबासारखा झाला होता. वीकेंडला एकत्र बसणं, अचानक चहा, किंवा कुणाच्या घरी डिनर—ही routine झाली होती.

गोष्ट सुरू झाली एका अगदी साध्या observation पासून, जो सुरुवातीला कोणी फार serious घेतला नाही.

त्या संध्याकाळी सगळे श्रीच्या घरी बसले होते. गप्पा, हशा, आणि नेहमीचा gossip चालू होता. तेवढ्यात प्रसन्ना casually म्हणाला, “तुम्ही B टॉवरच्या पार्किंगमध्ये फिरायला येणाऱ्या त्या कपलला पाहिलंय का?”

रश्मीने लगेच उत्तर दिलं, “हो ना, रोज दिसतात जवळपास. शांतपणे चालतात. कोण आहेत ते माहित नाही.”

स्वप्निलनेही मान डोलावली, “हो, मी पण दोन-तीन वेळा पाहिलंय.”

प्रसन्ना थोडा थांबला. “तुम्हाला त्या बाईचं appearance कसं वाटलं?”

वैषू हसली, “अरे काय question आहे हा… normal आहे. Jeans-top, ponytail. का?”

प्रसन्नाच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. “नाही… ती तशी नाही दिसत.”

“म्हणजे?” श्रीने विचारलं.

“ती… yellow कुर्ता घालते. केस मोकळे असतात. आणि… ती थोडी वेगळी वाटते. शांत. आणि कधी कधी माझ्याकडे बघते.”

क्षणभर सगळे शांत झाले. मग रश्मी हसत म्हणाली, “तू दुसऱ्या कुणाला बघतोयस बहुतेक.”

“नाही,” प्रसन्ना म्हणाला, “माणूस तोच आहे. पण बाई वेगळी आहे.”

श्रेया हलकंसं हसत म्हणाली, “तू जास्त observe करतोयस. Chill.”

सगळे हसले, विषय बदलला. पण प्रसन्नाच्या मनात ती गोष्ट तशीच अडकून राहिली.


पुढचे काही दिवस प्रसन्नाला ती बाई वारंवार दिसत राहिली. नेहमी B टॉवरच्या पार्किंगमध्ये, कधी गाड्यांच्या रांगांमध्ये, कधी एका खांबाजवळ उभी, कधी त्या माणसासोबत हळू चालत. माणूस अगदी साधा, लक्षात न राहणारा. पण ती बाई—ती वेगळी होती. तिच्या चालण्यात, तिच्या नजरेत, काहीतरी विचित्र स्थिरपणा होता.

एकदा सकाळी तो कार काढत होता. ते दोघं बाजूने चालत गेले. प्रसन्नाने सहज मान हलवली. माणसानेही हलकंसं स्मित केलं. पण ती बाई थोडा वेळ थांबली, त्याच्याकडे बघत राहिली, आणि म्हणाली, “Late ho raha hai… jaldi niklo.”

तो थबकला. उत्तर द्यायच्या आत ते दोघं पुढे गेले.


त्या रात्री त्याने पुन्हा सगळ्यांना सांगितलं.

“ती माझ्याशी बोलली आज.”

“काय बोलली?” वैषूने विचारलं.

“Late ho raha hai… असं.”

“तुलाच?” स्वप्निलने विचारलं.

“हो.”

श्रीने थोडं serious होत विचारलं, “तुला खात्री आहे ना, तू काही imagine करत नाहीयस?”

प्रसन्ना चिडला नाही, पण ठामपणे म्हणाला, “मी जे पाहतोय ते सांगतोय.”

कैलास काका शांतपणे ऐकत होते. त्यांनी हलक्या आवाजात विचारलं, “तुम्ही सगळ्यांनी तिला एकाच वेळी नीट पाहिलंय का?”

सगळे एकमेकांकडे बघायला लागले.

“नाही,” रश्मी म्हणाली, “असं खास नाही.”


पुढच्या दिवशी सगळ्यांनी ठरवलं—एकदा सगळे मिळून B टॉवर पार्किंगमध्ये जाऊन त्या कपलला observe करू.

संध्याकाळी सगळे तिथे जमले. थोडा वेळ काहीच नाही. मग दूरून ते दोघं चालत येताना दिसले.

“तोच आहे,” श्री म्हणाला.

“हो, तोच,” स्वप्निल म्हणाला.

“आणि ती…” वैषू म्हणाली, “आज blue top घातलाय.”

प्रसन्ना एकदम म्हणाला, “कुठे blue? Yellow आहे.”

सगळे त्याच्याकडे वळले.

“तुला खरंच yellow दिसतेय?” श्रेयाने विचारलं.

“हो,” तो म्हणाला, “तुम्हाला नाही दिसत का?”

सगळ्यांनी पुन्हा बघितलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ.

“नाही,” रश्मी म्हणाली, “ती clearly blue top मध्ये आहे.”

ते दोघं जवळ आले. माणसाने सगळ्यांकडे पाहून हलकंसं हसत मान हलवली. बाईनेही तसंच केलं. पण प्रसन्नाकडे बघताना तिची नजर थोडी जास्त वेळ थांबली.


त्या रात्री वातावरण बदललं होतं. जोक्स कमी झाले होते.

“काहीतरी off आहे,” स्वप्निल म्हणाला.

“कदाचित lighting असेल,” रश्मी म्हणाली, पण तिच्या आवाजात खात्री नव्हती.

कैलास काका म्हणाले, “Lighting रंग बदलू शकतं, पण perception सगळ्यांचं वेगळं असणं… ते थोडं वेगळं आहे.”


पुढच्या काही दिवसांत गोष्ट अजून विचित्र झाली. प्रसन्नाला ती बाई कधी कधी एकटी दिसू लागली—पार्किंगमध्ये एखाद्या गाडीच्या मागे उभी, किंवा खांबाच्या सावलीत. पण बाकी कुणालाही ती एकटी दिसली नाही. सगळ्यांना ती नेहमी त्या माणसासोबतच दिसायची.

एकदा संध्याकाळी तो लिफ्टची वाट बघत उभा होता. लिफ्टचं दार उघडलं. आत तो माणूस उभा होता. बाई त्याच्या बाजूला होती. प्रसन्ना आत गेला. तिघं शांत उभे. समोरच्या आरशात reflection दिसत होतं.

प्रसन्नाने आरशात बघितलं.

त्याला स्वतःचा आणि त्या माणसाचा reflection दिसला.

ती बाई… दिसली नाही.

त्याने पटकन बाजूला वळून बघितलं. ती तिथेच उभी होती.

पुन्हा आरशात बघितलं—नाही.

त्याचा श्वास अडकला.

ती हळू आवाजात म्हणाली, “Sabko sab nahi dikhta.”

लिफ्ट थांबली. ते दोघं बाहेर गेले.


त्या रात्री प्रसन्ना खूप वेळ शांत बसला होता. श्रेयाने विचारलं, “काय झालं?”

त्याने सगळं सांगितलं. आरशात न दिसणं, तिचं बोलणं.

श्रेया गोंधळली होती, पण घाबरलेलीही होती. “आपण त्या माणसाशी बोलूया का?” तिने विचारलं.


दुसऱ्या दिवशी प्रसन्नाने तेच केलं. पार्किंगमध्ये ते दोघं दिसले तेव्हा तो त्यांच्या जवळ गेला.

“Excuse me,” तो म्हणाला.

माणूस थांबला. “Yes?”

“आपण इथेच राहता ना?”

“हो, B टॉवर.”

“आणि… ही तुमची wife?”

माणूस सहज म्हणाला, “Yes.”

“तिचं नाव?”

“नेहा.”

प्रसन्नाने तिच्याकडे बघितलं.

ती हसली. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी ओळखीचं होतं, पण स्पष्ट नाही.

“Tumhe pata hai,” ती हळू आवाजात म्हणाली.

माणसाने काही ऐकलं नाही.

“Sorry?” प्रसन्ना म्हणाला.

“Nothing,” माणूस म्हणाला, “we should go.”

ते निघून गेले.


त्या दिवसानंतर प्रसन्ना जास्तच alert झाला. त्याला एक गोष्ट लक्षात आली—ती बाई नेहमी त्या माणसासोबत असते, पण तिचं presence वेगळं वाटतं. जणू ती त्या माणसाच्या सोबत आहे… पण त्याच्याशी जोडलेली नाही.

कधी कधी तो माणूस पुढे चालत असतो आणि ती मागे थांबते. कधी तो बोलतो आणि ती शांत असते. कधी तो आजूबाजूला बघतही नाही, पण ती प्रसन्नाकडे बघते.


एकदा रात्री उशिरा प्रसन्ना पार्किंगमध्ये गेला. सगळीकडे शांतता होती. लाईट्समध्ये हलका flicker. दूर एक गाडी उभी होती. तिच्या बाजूला ती बाई उभी होती.

यावेळी तो माणूस नव्हता.

प्रसन्ना हळूच तिच्याकडे गेला. “आज तो नाही?”

ती काही बोलली नाही. फक्त त्याच्याकडे बघत राहिली.

“तू… आहेस कोण?” त्याने विचारलं.

ती हलकंसं हसली. “Jo tum dekhte ho… wahi hoon.”

“बाकी लोक वेगळं का पाहतात?” त्याचा आवाज थोडा कडक झाला.

ती थोडी मागे सरकली. “Sab apna dekhte hain.”

“मग तू फक्त मलाच का दिसतेस?” तो म्हणाला.

ती काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, “Jab koi akela hota hai… tab zyada clearly dikhta hai.”

प्रसन्ना काही बोलला नाही.

ती वळली… आणि अंधारात चालत गेली.


त्या रात्रीनंतर काही दिवस ती दिसली नाही.

ग्रुपमध्ये हळूहळू सगळं परत normal झालं. सगळ्यांनी ते विसरायचा प्रयत्न केला. पण प्रसन्नाच्या डोक्यात प्रश्न तसाच होता—ती कोण होती, आणि का फक्त त्याला वेगळी दिसत होती?


एक संध्याकाळी सगळे पुन्हा भेटले होते. गप्पा चालू होत्या. तेवढ्यात रश्मी सहज म्हणाली, “अरे, काल मी त्या कपलला पाहिलं पार्किंगमध्ये.”

सगळे तिच्याकडे वळले.

“कोण?” स्वप्निलने विचारलं.

“तोच… B टॉवर वाला. पण… त्याच्या सोबतची बाई थोडी वेगळी वाटली काल.”

प्रसन्नाचा श्वास थांबला.

“कशी?” त्याने शांतपणे विचारलं.

रश्मी थोडा वेळ विचारात पडली. “माहित नाही… कपडे आठवत नाहीत… पण… तिचं face clear दिसलं नाही. Somehow blur वाटत होतं.”

वैषू लगेच म्हणाली, “मलाही काल तसं वाटलं.”

श्रीने कपाळावर आठ्या घेतल्या, “मला काही फरक दिसला नाही.”

सगळे पुन्हा शांत.


प्रसन्ना खुर्चीत टेकला. त्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता.

जर सगळ्यांना ती सारखी दिसत नसेल…

जर प्रत्येकाला ती वेगळी दिसत असेल…

जर कधी ती दिसते… कधी नाही…

मग ती खरंच त्या माणसाची बायको होती का?

की फक्त… कोणीतरी… जी त्या माणसासोबत दिसते…

पण प्रत्यक्षात… कोणाच्याच सोबत नसते?


त्या रात्री घरी जाताना प्रसन्नाने पार्किंगमध्ये एक नजर टाकली. दूर… एक कपल चालत होतं. माणूस ओळखीचा. बाई सावलीत होती.

त्याने डोळे बारीक करून बघितलं. क्षणभर त्याला वाटलं—ती yellow कुर्ता मध्ये आहे. पुढच्या क्षणी—काहीच स्पष्ट दिसलं नाही.

आणि त्याला अचानक जाणवलं—

कदाचित प्रश्न हा नाही की ती कोण आहे…

प्रश्न हा आहे की… ती खरंच आहे का.