प्रवाह पलीकडचा पहारा
कोलाडच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं ‘रिव्हर फ्रंट’ रिसॉर्ट. मुंबईच्या गोंगाटापासून दूर, कुंडलिका नदीच्या कुशीत असलेलं हे ठिकाण दिसायला जेवढं शांत होतं, तेवढंच ते एकाकी होतं. सुतारवाडी गावातून कच्च्या रस्त्याने प्रवास करत जेव्हा रोहन आणि अमितच्या गाड्या रिसॉर्टच्या गेटवर पोहोचल्या, तेव्हा अंधार चांगलाच दाटला होता.
“अरे बापरे! रस्ता तर संपता संपत नव्हता. पण जागा एकदम भारी आहे,” अमित गाडीतून उतरत म्हणाला.
रोहनने आपली तीन वर्षांची मुलगी सिया हिला कडेवर घेतलं. मागे अमितची पत्नी स्नेहा आणि मुलगा अर्जुनही उतरले. रिसॉर्टचे मॅनेजर, काका, कंदील घेऊन आले. “या साहेब. आज फक्त तुम्हीच आहात. दुसरं बुकिंग नाहीये, त्यामुळे पूर्ण शांतता मिळेल.”
पण रोहनचं लक्ष अचानक लांबवर उभ्या असलेल्या एका कारकडे गेलं. “काका, तुम्ही म्हणालात दुसरं कोणी नाहीये, मग ती पांढरी गाडी कोणाची?”
काका क्षणभर थबकले. “असेल कोणाची तरी बाहेरची. चला, तुमचं सामान रूममध्ये नेतो.” काकांच्या आवाजात एक अनाकलनीय अस्वस्थता होती, जी रोहनने टिपली.
त्या रात्री डिनर करताना रोहनला गार्डनच्या टोकाला दोन आकृत्या दिसल्या. एक तरुण मुलगा, ज्याने अतिशय भडक, ‘रेनबो’ प्रिंटचा टी-शर्ट घातला होता आणि एक मुलगी, जी पांढऱ्या स्कर्टमध्ये होती. ते दोघेही अंधारात उभे राहून रोहन आणि अमितच्या मुलांकडे एकटक बघत होते.
“अमित, ते बघ. ते लोक कोण आहेत? काका तर म्हणाले कोणीच नाहीये,” रोहन कुजबुजला.
अमितने पाहिलं. तो मुलगा अतिशय संशयास्पद वाटत होता. त्याने आपल्या हातातील मोबाईलमध्ये मुलांचा फोटो काढल्यासारखं वाटलं. “रोहन, मला हे प्रकरण ठीक वाटत नाहीये. हे लोक एखाद्या किडनॅपर गँगचे वाटतायत. बघ कसं रोखून बघतायत मुलांकडे.”
दुसऱ्या दिवशी सकाळी रोहनला सियाच्या खेळण्यांमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं— “आज ही नदी कुणाला तरी सोबत घेऊन जाईल. सावध राहा.”
रोहनचा थरकाप उडाला. त्याने अमितला बोलावले. दोघांनी ठरवलं की त्या कपलचा छडा लावायचाच. ते दोघे बागेत दिसताच रोहन आणि अमित त्यांच्या दिशेने धावले.
“ए! थांबा तिथे! कोण आहात तुम्ही?” रोहन ओरडला.
तो निळा-पिवळा टी-शर्ट वाला मुलगा आणि ती मुलगी क्षणात झाडीत शिरले. रोहन आणि अमितने त्यांचा पाठलाग केला. ते दोघे जंगलाच्या दिशेने धावत होते. रोहन अगदी त्यांच्या जवळ पोहोचला होता, त्याने त्या मुलाच्या टी-शर्टला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो मुलगा अत्यंत चपळाईने निसटला. ते दोघे एका जुन्या पडक्या विहिरीच्या मागे वळले आणि गायब झाले.
“साले, गायब झाले! अमित, हे लोक प्रोफेशनल आहेत. त्यांना या जागेची पूर्ण माहिती आहे,” रोहन धापा टाकत म्हणाला.
दुपारी पुन्हा एक घटना घडली. अमितने पाहिलं की तो मुलगा मुलांच्या बेडरूमच्या खिडकीतून आत डोकावत होता. अमितने त्याला पकडण्यासाठी उडी मारली, पण तो मुलगा पुन्हा एकदा छतावरून उडी मारून पसार झाला. आता मात्र रोहन आणि अमितचा संयम सुटला होता. त्यांना खात्री होती की हे कपल मुलांच्या अपहरणाचा मोठा कट रचत आहे.
संध्याकाळी आकाशात ढग दाटून आले. पावसाची रिपरिप सुरू झाली. धरणातून पाणी सोडल्याचा सायरन वाजला. कुंडलिका नदीचा प्रवाह रौद्र रूप धारण करू लागला.
रोहन आणि अमित रूममध्ये बसले होते. अचानक वीज गेली. बाहेरून एक मोठी ओरड ऐकू आली. रोहन बॅटरी घेऊन बाहेर धावला. त्याला दिसलं की बागेचं ते लोखंडी गेट उघडं आहे आणि तो ‘रेनबो’ टी-शर्ट वाला मुलगा पाण्याच्या दिशेने धावत सुटलाय. त्याच्यापासून शंभर एक मीटर वरती त्याला सिया दिसली आणि मग अचानक लक्षात आलं की ती कशी काय गेली. त्याला वाटलं आता ती या मुलाच्या तावडीत सापडणार. रोहन होती नव्हती तेवढी एनर्जी एकवटून त्यांच्या दिशेने धावत सुटला. त्याला काहीही करून सियाला त्याच्या हातात लागू द्यायचं नव्हतं.
“पकडा त्यांना! ते सियाला घेऊन जातायत!” मीरा जोरात किंचाळली. मीरा पण तिथेच नदीच्या बाजूला होती.
पाऊस प्रचंड होता. नदीच्या काठावर चिखल झाला होता. तो मुलगा सियाच्या अगदी जवळ पोहोचला होता.
“सोडून दे तिला! नाहीतर जिवंत सोडणार नाही!” रोहनने ओरडून धमकी दिली.
तेवढ्यात सियाचा तोल गेला आणि ती पाण्यात घसरून पडली. प्रहार जोरात असल्याने ती पाण्यात आत ओढली जाऊ लागली. त्या मुलाने स्वतःच्या जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारली आणि सियाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात त्या पांढऱ्या स्कर्ट वाली मुलगी तिथे आली आणि तिने सियाला त्या मुलाकडून घेतलं आणि रोहन कडे दिलं.
प्रवाह अचानक वाढला त्या मुलीने त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण ती सुद्धा पाण्यात पडली.
“रोहन, ते वाहून जातायत!” अमित ओरडला.
रोहन आणि अमितने दोरखंड घेऊन पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला. तो मुलगा आणि मुलगी पांढऱ्या फेसाळलेल्या पाण्यात गटांगळ्या खात होते. “आमचा हात धरा!” रोहनने दोर फेकला.
त्या मुलाने रोहनकडे पाहिलं. त्याने हसून मान हलवली, जणू तो म्हणत होता की ‘आता वेळ संपली आहे’. एका क्षणात तो रेनबो टी-शर्ट आणि तो पांढरा स्कर्ट त्या अथांग पाण्यात गडप झाले. रोहन आणि अमित तासनतास तिथेच बसून राहिले, पण त्या दोघांचा मागमूसही लागला नाही.
काही वेळातच पोलीस आणि स्थानिक बचाव पथक तिथे पोहोचलं. रोहनने इन्स्पेक्टरला सगळी हकीकत सांगितली.
“इन्स्पेक्टर, त्या कपलने सियाला वाचवलं आणि स्वतः वाहून गेले. ते त्या दिशेला गेलेत, प्लीज त्यांना शोधा. त्या मुलाने असा मल्टिकलर टी-शर्ट घातला होता,” रोहन रडत सांगत होता.
इन्स्पेक्टरने रोहनकडे पाहिलं आणि मग मॅनेजर काकांकडे. इन्स्पेक्टरचा चेहरा गंभीर झाला. “कसलं कपल साहेब? तुम्ही शुद्धीत तर आहात ना?”
“काय बोलताय तुम्ही? आम्ही त्यांचा दोन दिवस पाठलाग केलाय. त्यांनी आम्हाला चिठ्ठ्या पाठवल्या, मुलांवर नजर ठेवली. आम्हाला वाटलं ते किडनॅपर आहेत, पण त्यांनी आमच्या मुलीचा जीव वाचवला!” अमित ओरडून म्हणाला.
इन्स्पेक्टरने आपल्या खिशातून एक जुना, चुरगळलेला फोटो काढला. “साहेब… तुम्ही या दोघांबद्दल बोलताय का?”
फोटो पाहताच रोहन आणि अमितचे पाय थरथरू लागले. फोटोमध्ये तोच मुलगा होता, ज्याने तोच ‘रेनबो’ टी-शर्ट घातला होता. त्याच्या गळ्यात सानिया नावाच्या मुलीचा हात होता—तीच पांढऱ्या स्कर्ट वाली मुलगी.
“हे कोण आहेत?” रोहनने थरथरत्या आवाजात विचारलं.
इन्स्पेक्टरने सुस्कारा सोडला. “हे समीर आणि सानिया. आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी, २१ मार्च २०२४ ला हे दोघे इथेच राहायला आले होते. त्या दिवशी धरणाचं पाणी अचानक सोडलं होतं आणि हे दोघं पाण्यात वाहून गेले.
रोहनच्या अंगावर काटा आला. “म्हणजे… ते मेलेत?”
“हो साहेब. आज त्यांची दुसरी पुण्यतिथी आहे. दोन वर्षांपासून त्यांचा मृतदेह कोणालाच सापडलेला नाही.
इन्स्पेक्टरने नदीच्या संथ प्रवाहाकडे पाहिलं. ” ते किडनॅपर नव्हते साहेब… ते या नदीचे ‘राखणदार’ होते.”
बाहेर पाऊस थांबला होता. रोहनने नदीकडे पाहिलं. त्याला लांबवर, पांढऱ्या धुक्यात तो रेनबो टी-शर्ट पुन्हा एकदा चमकल्यासारखा वाटला. ते दोघे आता शांतपणे प्रवाहाच्या दिशेने चालले होते, जणू या वर्षीचं त्यांचं काम पूर्ण झालं होतं.